औरंगाबाद : उन्हाळ्यात दहावी-बारावी परीक्षा आटोपताच शाळा- महाविद्यालयांना सुट्या लागताच अनेकांनी बाहेर गावी सहलीसाठी जाण्याचा बेत आखला आहे. त्यामुळे अनेकांनी दोन-दोन महिने आगोदर बाहेर जाण्याचा बेत आखत रेल्वेची बुकिंग केली आहे. यामुळे बर्याच रेल्वे फुल झाल्या असून अनेकांना बुकिंग करूनही वेटींगलिस्टमध्ये राहण्याची वेळ आली आहे.
मार्च अखेर दहावी-बारावीची परीक्षा संपताच अनेकजण दरवर्षी तिरुपती, रामेश्वरम, गोवा, दिल्ली, आग्रा, हैद्राबाद, चेन्नई सह आदी ठिकाणी सहलीसाठी जातात. यावर्षीही अनेकांनी मार्च अखेर परीक्षा संपताच बाहेर सहलीसाठी जाण्याचे नियोजन केले आहे. त्यानिमित्ताने अनेकांनी चार महिन्यापासून रेल्वे ची ऑनलाईन बुकिंगही केली आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना महिना आगोदर बुकिंग करूनही प्रतीक्षा यादीत राहण्याची वेळ आली आहे. तिकिट निश्चित होईल का? याचीही चिंता अनेक प्रवाशांना लागली आहे. सर्वाधिक वेटिंग ही तिरुपती आणि रामेश्वरम, गोवा या ठिकाणी जाणार्या रेल्वेना आहे. या मार्गे जाणार्या रेल्वेना एप्रिल , जूनपर्यत वेटिंग आहे. यामुळे अनेकांना महिना आगोदर बुकिंग करूनही प्रतीक्षा करावी लागत आहे.
या रेल्वेला सर्वाधिक वेटिंग
उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे रेल्वेला गर्दी वाढत आहे. सचखंड एक्स्प्रेससाठी वेटिंग कायम असून तिरुपती एक्सप्रेस आणि रामेश्वरम एक्सप्रेस ला सर्वाधिक गर्दी पहायला मिळत आहे. त्यातल्या त्यात तिरुपती, गोवा आणि रामेश्वरम या ठिकाणी जाणार्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने अनेकांनी दोन महिने आगोदर बुकींग केलेली असताना त्यांच्यावर प्रतीक्षायादीत राहण्याची वेळ आली आहे. यामध्ये तिरुपती एक्सप्रेस ला मार्च महिन्यात सर्वाधिक वेटिंग आहे. यामध्ये 4 मार्चला 40 तर 17 मार्चला 49, 18 मार्चला 24 आणि 25 मार्चला 45 प्रवाशांना प्रतीक्षा यादीत राहावे लागले आहे. तर 1 एप्रिल ला 30, 8 एप्रिल ला 28 प्रवाशांना वेटिंग लिस्टमध्ये राहण्याची वेळ आली आहे. तिरुपती बरोबर रामेश्वरमला जाणार्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातल्या त्यात रामेश्वरम एक्सप्रेस फुल झाली असल्याने अनेक प्रवाशांना बुकिंग करूनही जून महिन्यापर्यंत प्रतीक्षा यादीत राहावे लागले आहे. या रेल्वेला 4 मार्च ते 25 मार्च दरम्यान 156 प्रवाशी वेटिंग लिस्टमध्ये आहे. तर एप्रिल मध्ये 136 तर मे महिन्यात 120 तर जून महिन्यात 5 प्रवाशांना प्रतीक्षा यादीत राहावे लागले आहे. मुबंई-मडगाव म्हणजे गोव्याकडे जाणार्या एक्सप्रेस ला मार्च महिन्यापर्यंत वेटिंग आहे. तर सचखंड एक्सप्रेस आणि नागपूर कडे जाणारी दीक्षाभूमी एक्सप्रेस ला 10 मार्च पर्यत 250 प्रवाशांची नावे वेटिंग लिस्टमध्ये आहे. त्यामुळे बुकिंग करूनही जागा मिळेल का असा प्रश्न प्रवाशांसमोर निर्माण झाला आहे. किमान सुट्ट्यांमध्ये तरी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन विषेश रेल्वे किंवा डब्बे वाढविण्यात यावे अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.